Sunday, October 16, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ५


अब तो हमे आगे है बढते रहना......
सिंधू नदीची सोबतजम्मु काश्मीरमधील विधानसभेमध्ये अफजल गुरूला जीवदान देण्याच्या ठरावावरून गदारोळ झाल्यानंतर आणि नुकताच बनिहालजवळ रेल्वेचा आशियातला दुसरा सर्वांत मोठा बोगदा खुला झाल्यानंतर वर्णनाचा हा भाग लिहितोय. रेल्वे काश्मीर व पूर्वांचलमध्ये अत्यंत महान कार्य करत आहे. काश्मीरमध्ये आता अगदी श्रीनगर- बारामुल्लापर्यंत रेल्वे पोचली आहे. भारतात घडणा-या ह्या काही मोजक्या चांगल्या घटना...

करगिलमध्ये संध्याकाळी पोचल्यानंतरचा दिवस मस्त गेला होता. थोडफार फिरलो, गाव थोडसं पाहिलं, सुरू नदीचा रोरावणारा सूर ऐकला. गावाच्या चारही बाजूंना असलेले डोंगर बघितले. करगिलमधलं आमचं हॉटेल तसं सामान्यच होतं, तरीसुद्धा तिथे वीजेची चांगली सोय होती. आधी ऐकलं होतं की काश्मीर व लदाखमध्ये वीज पुरवठा अत्यंत कमी आहे. परंतु इथेतरी लॅपटॉप व मोबाईल व्यवस्थित चार्ज होत होते.

पर्यटन उद्योगाचा ब-याच प्रमाणात प्रभाव असल्यामुळे हॉटेलमधले कर्मचारीसुद्धा चांगली सेवा देत होते. दुस-या दिवशी बरोबर पहाटे साडेपाच वाजता गरम पाणी आणून दिलं.

करगिलमधली पहाट!! शब्दातीत अनुभवांमधलाच एक असूनसुद्धा ‘एकमेव!’ आकाशात सप्तर्षी दिसत होते. गंमत म्हणजे ते उलटे दिसत होते. करगिल जवळजवळ ३४.५ उत्तर अक्षांशावर असल्यामुळे तिथे ३४.५ उत्तर अंश इतक्या आकाशातले तारे मावळणार नाहीत. त्यामुळे ध्रुव तारासुद्धा नेहमीच्या २० अंशांऐवजी ३४ अंश इतका बराच वर दिसत होता व सप्तर्षी वर आल्यामुळे मावळत नव्हते. हवा थंड पण आल्हाददायक होती. सूर्योदय बघायला मिळेल असं वाटलं; पण ढग होते आणि डोंगरापलीकडे सूर्योदय झाला. सकाळची प्रसन्न हवा, करगिल आणि सुरूगर्जना!! जन्नत, जन्नत!!
करगिल गाव व सुरू नदी

 
सकाळी लवकर निघालो. आज करगिलमधून निघून मुलबेक- लामायुरू- खालत्से- पत्थरसाहीबमार्गे लेहला पोचायचं होतं. खालत्सेपासून सिंधू नदी सोबत येणार होती......

करगिलमध्ये पेट्रोल भरलं. दूरवर हिमाच्छादित पर्वत दिसत होते. पेट्रोलपंपाच्या समोर, रस्त्याला लागूनच एक कोसळलेलं घर होतं. हसनजींनी सांगितलं की ते घर करगिल युद्धामध्ये पाकिस्तानच्या तोफेच्या मा-यामुळे मोडलं होतं......... युद्धाची, अशांततेची व त्याबरोबर सेनेच्या पराक्रमाची व लोकांच्या धैर्यशीलतेच्या अशा खुणा सतत सोबत होत्या...

करगिलच्या जवळून श्रीनगर- लेह मार्ग जातो. गावाबाहेर येऊन परत महामार्ग गाठला. महामार्ग नावालाच; कारण इथल्या पर्वतांमुळे, द-यांमुळे व प्रतिकूल हवामानामुळे तो क्वचितच कुठे मोठा रस्ता दिसतो. साधारणत: जेमतेम मोठी ट्रक जाऊ शकेल असाच मार्ग. आणि क्रॉसिंगच्या जागाही कमीच.
सोनामार्गच्या पुढे नेहमी होणा-या चकमकी, घुसखोरी, अतिरेकी हल्ले ह्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे तिथून पुढच्या भागामध्ये सेनेची जी वर्दळ दिसते ती एक तर नियंत्रण रेषेलगतच्या तळांना पुरवठा करणारी व नियंत्रण रेषेलगतच्या चौक्यांची असते. ही वर्दळसुद्धा प्रचंड असते. सेनेचे ट्रक्स मोठ्या संख्येने काफिल्यामधून जात राहतात. तितका वेळ इतर वाहतूक थोडी अडकून पडते.

करगिलहून पुढे निसर्गामध्ये हिरवा रंग कमी कमी होत जाऊन गुलाबी, करडा, लाल, पिवळा असे रंग दिसत जातात. करगिलजवळची हिरवळ- झाडी व शेतीसुद्धा बरीच कृत्रिम, मानवनिर्मित आहे. डोंगरांचा नव्हे पर्वतांचा आकार मात्र अजून मोठा, भव्य, अतिभव्य होत जातो. जणू संख्या ज्याप्रमाणे खर्व, निखर्व, पद्म, महापद्म अशा अनंताकडे जातात, त्याप्रमाणे पर्वत अतिभव्य, त्याहूनही अतिभव्य होत जात होते. ही भव्यता, व्यापकता विराट होती! शब्दातीत, इंद्रियातीत व भावातीतसुद्धा......
रस्त्यालगतचा प्रदेशसुद्धा रूप बदलतो. वस्ती जवळजवळ विरळ होत जाते. क्वचित कुठे काही लोक दिसले तर दिसतात. मुख्य वस्ती सेना, सीमा सडक संगठन अशीच दिसते. गावंसुद्धा विशेष नाहीच. मधून मधून छोटी हॉटेल्स किंवा दुकान दिसतात. अन्यथा एकदम निर्जन प्रदेश. रस्त्यावरची वाहतुकसुद्धा तुरळकच; कारण ती नियंत्रित केलेली असते. रस्ता मात्र काहीसा ठीक आहे. कारण झोजिला ओलांडल्यानंतर पुढे मुख्य असे दोनच घाट (ला) आहेत. नमिकेला आणि फोटूला. फोटूला जरी श्रीनगर- लेह रस्त्यावरचा सर्वोच्च बिंदु असला, तरी घाटमाथा म्हणून तो आणि नमिकेलासुद्धा विशेष दुर्गम नाहीत आणि ते हिवाळ्यातही चालू असतात. त्यामुळे प्रवास काहीसा सुकर आहे.

करगिल सोडल्यावर लगेचच एक रस्ता बटालिककडे जातो व पुढे एक रस्ता दक्षिण मध्य काश्मीरमधील झांस्कर भागात जातो. इथे जाण्यासाठीसुद्धा आयएलपी- इनर लाईन परमिट घ्यावा लागतो. लदाखमध्ये लेहच्या आसपासचा परिसर वगळता इतर सर्व प्रेक्षणीय स्थळांसाठी इनर लाईन परमिट घ्यावा लागतो; कारण हा सर्व भाग नियंत्रण रेषेला लागूनच व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात आहे. त्यामुळे तिथली वाहतूक व पर्यटन नियंत्रित आहे, जे अगदी योग्य आहे.

करगिल गाव सोडल्यापासून पुढे सुमारे साठ किलोमीटर्सवर मुलबेक हे पहिलं मोठं गाव येतं. इथे मैत्रेय बुद्धाची विशाल मूर्ती दिसते. मूर्तीजवळच एक गोम्पा आहे आणि तिच्यामध्ये गोल फिरणारं चक्र आहे. खास लदाख शैलीच्या गोम्पा (बौद्ध मठ) इथून सुरू होतात. मुलबेकच्या आसपास अत्यंत कोरडे पाषाण म्हणता येतील असे उंच व विशाल पर्वत आहेत. त्या पर्वतांमध्ये गुहांसारख्या काही फटी किंवा बंदिस्त चौकटी दिसत होत्या. कानावर आलं की सततच्या वाहत्या वा-यामुळे पहाड झिजून तशा फटी निर्माण झाल्या आहेत. पण विश्वास बसला नाही. कारण मुलबेकच्या खूप आधीपासून त्या स्वरूपाचे मोठे पहाड दिसत होते; पण तशी रचना/ वा-यामुळे झालेली झीज आधी कुठेच दिसली नाही. आणि त्या फटींना साचेबद्ध चौकटींचे स्वरूपसुद्धा होते. मनातून वाटलं की त्यासुद्धा जुन्या गोम्पा किंवा त्याहूनही भव्य वास्तूच असाव्यात. पुढेही अशा प्रकारच्या पहाडातील रचना दिसत होत्या. 
वर दिसणा-या रचना नैसर्गिक आहेत असं वाटत नव्हतं. नक्कीच ह्या जुन्या वास्तू असल्या पाहिजेत....

मैत्रेय बुद्धाची मूर्ती बरीच जुनी होती व खूप उंच होती. आतमध्ये एक मठ आहे. तिथे फिरताना मात्र चांगलं जाणवत होतं, की आपण उंचावर आणि विरळ हवेच्या ठिकाणी आहोत. पाच- दहा मिनिटातच शरीराचा विरोध लक्षात यायचा. मुलबेक गाव छोटसंच आहे. तिथे एका नेपाळी हॉटेलमध्ये नाश्ता कम जेवण करून पुढे निघालो. आता पुढे नमिकेला हा घाटमाथा होता.

वैराण, उजाड, रुक्ष परंतु तरीसुद्धा विराट, अतिभव्य, विलक्षण, अमानवी प्रदेश होता सर्व. उंचच उंच पहाड. काही श्रेष्ठतम पहाडांना श्वेत शिरपेचाचा मान..... अत्यंत भन्नाट दृश्य निरंतर चालूच होतं. विश्वरूपदर्शनाप्रमाणे हे हिमालय दर्शन होतं.

नमिकेला हा घाटमाथा फारसा दुर्गम नाही. करगिलच्या पुढे रस्ते पसरलेले आहेत, एकदमे उभे- खाली असे नाहीत. त्यामुळे घाटही फार अवघड असे नाहीत. नमिकेलाची उंचीही जेमतेम ३५०० मीटर्स होती; त्यामुळे तो विशेष वाटला नाही. पुढे जाताना एका ठिकाणी मात्र रस्त्यावर एक दरड कोसळली होती व तिचा मलबा जेसीबीद्वारे काढत होते. त्यामुळे थोडा वेळ वाहतूक थांबली होती. तिथून पुढे लामायुरू ही लदाखमधील सर्वांत मोठी गोम्पा (स्पेलिंग Gonpa आहे) लागते. रस्त्याच्या किंचित बाजूला उतारावरच्या डोंगरावर ह्या गोम्पाची मोठी वास्तु पसरली आहे. भरपूर भव्य व समृद्ध आहे. पर्यटकांनी गजबजलेली होती. मुलबेकप्रमाणे इथेही महाराष्ट्रीयन पर्यटक भेटले. बरेचसे विदेशीही होते. लामायुरू साधारणपणे करगिल व लेहच्या मध्यावर येतं. रस्त्यापासून थोड्या चढावर मुख्य वास्तू होती. जुन्या काळातील बरेचसे ग्रंथ, शिल्प, स्मारकं होती. लामा मोठ्या संख्येने दिसत होते. बुद्धमूर्ती ब-याच होत्या. आतमधील चित्रांमध्ये व शिल्पांमध्ये थोडीशी ड्रॅगन शैली दिसत होती... चीनी प्रभाव असावा.वर उजवीकडे पिवळ्या रंगाचा भाग दिसतोय, तो मूनलँड.


लामायुरूच्या लगतच्या परिसराला मूनलँड म्हणतात. कारण हा परिसर अक्षरश: चंद्राप्रमाणे दिसतो. खडकाळ, लालसर पिवळा रंग. लामायुरूपासून पुढे फोटूला व खालत्से लागतात. फोटूलावर एक प्रसारभारती केंद्र व कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी होते ते तिबेटी मंत्र कापडाच्या पट्ट्यांवर लिहिलेले होते. फोटूलाची उंचीही चार हजार मीटर्सच्या आसपास आहे. तिथे थंडी तितकी जाणवत नव्हती. परंतु भरपूर वारे वाहत होते.
खालत्से इथेही गोम्पा आहे. इथे येईपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते. लेहला संध्याकाळपर्यंत पोचायच्या दृष्टीने फार वेळ थांबलो नाही. खालत्सेचं वैशिष्ट्य म्हणजे इथून सिंधू नदी सोबत येते. इथून पुढे ती लेहपर्यंत व लेहच्या पुढेही काही ठिकाणी सोबत करणार होती. सिंधु नदी...... शब्दातीत, भावातीत, कल्पनातीत, इंद्रियातीत असं अतीत सांगत होती. अवर्णनीय आणि अमूर्त.


ज्या नदीमुळे संस्कृती निर्माण झाली, ज्या नदीमुळे आजही देशाला नाव मिळालेलं आहे, त्या नदीच्या किनारी पोचलो होतो. हा अनुभव शब्दांच्या कित्येक लाख प्रकाशवर्ष पुढचा आहे. तिथे भावच हवा आणि अनुभवच हवा. एकदा नव्हे अनेकदा जाऊनच यावं. मनामध्ये तीव्र ऊर्मी होती की सरळ पुढे जावं आणि पहाडामध्ये विलीन व्हावं..... नदीचा प्रवाह अर्थातच आमच्या उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडे जात होता..........

सिंधू नदीच्या सोबत पुढचा प्रवास सुरू झाला.... नदी कधी उजवीकडे तर कधी डावीकडे होती. आता लेह जवळ येत चाललं. नदीचं पात्र लहान- मध्यम आकाराचं होतं. गर्जना होतीच आणि पाणी अर्थातच खूप ताजं व थंड होतं. प्रवाहीपणा... जीवन.... एक उगम, धारा असंख्य....

खालत्सीपासून रस्ता ब-यापैकी समतल झाला. लक्ष्य चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नजारा होता. किंबहुना लक्ष्य चित्रपटात दाखवलेले भागसुद्धा ओळखता येत होते... समतल पक्का रस्ता आणि लांब उंचावर डोंगर..... आहा हा..... अद्भुत..... न भूतो....

 


खालत्सेपासून पुढे निम्मू नावाचं एक गाव आहे. इथे सिंधू आणि झांस्कर नद्यांचा संगम आहे. आम्ही खूप वेळापासून ह्या संगमाची वाट पाहत होतो. दक्षिण मध्य काश्मीरच्या झांस्कर पर्वतराजींमध्ये उगम पावणारी झांस्कर नदी इथे सिंधू नदीला येऊन मिळते. ते दृश्य अत्यंत सुंदर होतं. खरं तर मुख्य रस्ता ब-याच उंचीवरून जात होता. परंतु आमची इच्छा लक्षात घेऊन हसनजींनी गाडी थेट नदीपर्यंत नेली. तिथे गेल्यावरचा अनुभव..... अहा हा..... सिंधू नदीच्या किना-यावर.... इथे नदीचं पात्र भरपूर मोठं होतं. मध्यम आकाराच्या लाटासुद्धा होत्या. नदीच्या पाण्याचा स्पर्श मात्र अत्यंत थंड होता. त्यामुळे फक्त तळपाय नदीमध्ये बुडवून वाळूत बसलो.... पलीकडच्या बाजूला झांस्कर येऊन सिंधूला मिळत होती. वाळूतच एक घर नवीन बांधलेलं दिसत होतं.
संगमाचं वरच्या रस्त्यावरून दिसणारं दृश्य. खाली किना-यावर एक घर व समोर एक रस्ता दिसतो. 
पाणी अत्यंत थंड असल्यामुळे मधून मधून पाय बाहेर काढावा लागत होता. त्यावेळी तिथे पाऊस पडत होता. मधूनच जरा मोठी सर येऊन गेली. दूरवर झांस्कर नदीमध्ये लाटा व वावटळ दिसत होती. तिथून एक रस्तासुद्धा येत होता. लदाखच्या अतिदुर्गम भागामध्ये सीमा सडक संगठनच्या गौरवशाली कार्याची ती एक खूण होती.

पावसामुळे मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. लदाखमध्ये सहसा पाऊसच पडत नाही. आणि पडला तर फार हानीकारक असतो. गेल्या वर्षीच्या ढगफुटीच्या आठवणी ताज्याच होत्या.... सिंधू नदीच्या आसमंतात पहुडल्यावर परत जायला निघालो..... अनिच्छेनेच. पण सिंधू नदी खूप वेळ सोबत करणार होती. बाजूचा रस्ता परत घेऊन वर येऊन मुख्य रस्त्याला लागलो. आता पुढे पत्थरसाहीब आणि मग लेह.....

पत्थरसाहीब हा एक अत्यंत मोठा गुरूद्वारा आहे. अर्थातच तो खूप समृद्ध व ऐसपैस आहे. ह्या ठिकाणी एका टेकडीवर एका राक्षसाने गुरू नानकांवर मोठा दगड मारला पण गुरू नानकांना काही इजा झाली नाही अशी कथा सांगितली जाते. नानकांवर फेकलेला दगड (पत्थर साहीब) आणि ती टेकडी दाखवतात. खूप मोठ्या परिसरात हा गुरूद्वारा आहे. इथून आम्ही निघालो तेव्हा अत्यंत सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. चांगला पाऊससुद्धा पडत होता. वा-याचा जोर भयानक होता. भितीदायक होता. आमचे हसनजी आम्हांला लवकर निघायला सांगत होते.


पुढे वाटेत एका जागी मॅग्नेटिक हिल लागते. इथे गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य होते, असं म्हणतात. म्हणजे न्युट्रल गेअरवर गाडी ठेवली व तिला ढकललं तर ती डोंगर चढते, असं म्हणतात. वेळ नव्हता, अंधार पडला होता व भयानक पाऊस होता म्हणून पुढे सरळ निघालो.... पत्थरसाहीबपासून पुढे आमच्या रस्त्यात एक सुंदर पूर्ण इंद्रधनुष्य दिसत होतं. अद्भुत नजारा होता...... फक्त वारा इतका सुसाट होता, की खिडक्या पूर्ण बंद करून घ्यावा लागल्या. इंद्रधनुष्याच्या जणू खालूनच आम्ही गेलो. संध्याकाळची वेळ व जोरदार वाहणारे वारे ह्या वातावरणात आम्ही लेह शहरामध्ये प्रवेश केला......

लेह अगदी आधुनिक शहर आहे. फक्त लोकसंख्या अन्य मेट्रो किंवा महानगरांइतकी नाही. छान वाटत होतं शहर. आणि का वाटणार नाही. इतक्या अतिभव्य व विशाल तरीही वैराण प्रदेशातून आलो होतो. मुख्य रस्त्याने येऊन थोड्याच वेळात हॉटेलवर येऊन पोचलो. आम्ही फोनवर बोललो होतो ते ट्रॅव्हल एजंट श्री मोहंमद हुसेन भेटले. लवकरच रूम मिळाली. त्यांची संपूर्ण प्रवासातली व वास्तव्यातली सेवा अप्रतिम अशीच होती. काहीच उणीव नाही. काहीच अडचण नाही. अखंड सौजन्य. लदाखी संस्कृतीमधला साधेपणा आणि आपुलकी......

तब्येतीला त्रास नव्हता. थंडीही फार नव्हती. चालताना किंचित हळु चालावं लागत होतं. बोलतानाही जरा थांबून बोलावं लागत होतं. पण अन्य काहीच त्रास नाही. तिथे इंटरनेट कॅफेही मिळाला. बंद पडलेले काही फोन्स सुरू झाले.

लेह..... एका अतिरोमांचक महायात्रेच्या मुख्य टप्प्यावर आम्ही आलो होतो. प्रत्येक वेळी स्वत:ला चिमटा काढून खात्री करून घ्यावीशी वाटत होती, की आम्ही लेहमध्ये आहोत, आम्ही इथे आहोत...... एका आगळ्यावेगळ्या जगामध्ये आमचा प्रवेश झाला आहे...... तिबेट हे जगाचं छप्पर मानलं जातं. आम्ही लेह म्हणजे तिबेटच्या उंबरठ्यावर होतो. सर्वच दृष्टीने अत्यंत रोमांचक क्षण....... अपूर्व.... अमूर्त.... अनंत..... अनादी.....
क्रमश:
(फोटो सौजन्य: परीक्षित आणि गिरीश)
पुढील भाग: लेहदर्शन

2 comments:

  1. या पूर्वीचा ब्लॉग टेस्ट फॉरमॅटमध्ये झाला होता. हा वन-डे फॉरमॅटमध्ये आटोपशीर आहे. फोटो भरपूर वापरलेत ही चांगली गोष्ट. फ्कत ह्या फोटोला कॅप्शन असतील तर वाचकांना या फोटोचे महत्व लगेच समजू शकेल.

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!