Monday, October 24, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ६

लेहदर्शन

सोनामार्गसह काश्मीरमध्ये ब-याच ठिकाणी हिमवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर आणि काश्मीरच्या चार जिल्ह्यांमधून ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट’ मागे घेण्याचा प्रस्ताव बनवण्यात आल्यानंतर भ्रमणगाथेतील पुढचं वर्णन लिहितोय...

११ ऑगस्टच्या सकाळी करगिलमधून निघून संध्याकाळी सहाच्या सुमारास लेहमध्ये पोचलो....... अभूतपूर्व अनुभव...... शब्दातीत.... लेह!! लदाख विभागाचं मुख्यालय. काश्मीरमधलं एक आगळं वेगळं शहर. सर्वच दृष्टीने एकमेव. शहर आहे, पण मोठं नाही. अत्यंत दुर्गम भागात असलं तरी आधुनिक आहे. उंची ३५०५ मीटर्स, फक्त.


लेह व एकूणच लदाख प्रदेशात हिवाळ्यामध्ये तपमान शून्यच्या खूप खाली जातं. द्रासमध्ये ते -६० अंशे से. इतकं कमी होतं, तर लेहमध्ये -२० पर्यंत जातं. त्यामुळे इथली जीवनशैली त्यानुसार घडली आहे. घरं त्यामुळेच जास्त जाड होती; भिंती, दरवाजे जास्त भक्कम होते. पर्यटकांचा अखंड ओघ असूनही अद्याप लेह साधं व आटोपशीर वाटत होतं. आकारानेसुद्धा लहानच आहे. पार्श्वभूमी व काही गोष्टी सोडल्या तर इतर शहरांसारखंच. बरीच नावं तिबेटी लिपीमध्ये दिसत होती. ही लिपी थोडीशी बंगाली लिपीच्या वळणाची आहे. कित्येक वाहनांचे क्रमांकसुद्धा तिबेटी लिपीत दिसत होते. पर्यटनाच्या उद्योगामुळे जेवण- हॉटेल, राहण्याची सोय इत्यादि बाबी इतरत्र आहेत, तशाच इथेही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे राहण्या- खाण्याचे हाल होत नाहीत.

लेह एका दुर्गम परिसराचा मध्यबिंदु आहे. खाजगी वाहनाव्यतिरिक्त प्रवासाच्या इतर सोयी जवळजवळ नगण्यच आहेत. काही बस उन्हाळ्यात श्रीनगर व मनालीच्या दिशेने जातात; पण त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे खाजगी वाहनचालक, प्रवासी एजंट ह्यांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं. लेह शहरामध्ये शहर बससेवा असल्याचं समजलं. परंतु तरीही, सामान्य माणसासाठी इथला प्रवास अवघडच आहे. सर्वच परिसर दुर्गम आहे व त्यामुळे एकंदरीत जीवनशैली व राहणीमानसुद्धा काहीसं अवघड होतं. अन्य भागांना उपलब्ध असलेले पर्याय इथे उपलब्ध होत नाहीत.

तरीसुद्धा पर्यटकांसाठी खूप सोयी निर्माण झालेल्या आहेत. लेहमध्ये इंटरनेट कॅफे मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात हा सर्व परिसर, लदाखचं विश्व असं होतं, ज्यामध्ये इंटरनेट ह्या साधनाचाच काय, सर्व मानवनिर्मित गोष्टींचा विसर पडावा.......

संध्याकाळी लेहमध्ये काहीशी थंडी जाणवत होती. जशी महाराष्ट्रातल्या गावांमध्ये हिवाळ्यामध्ये अनुभवता येते. आल्हाददायक थंडी होती. श्वास घेताना व हालचाल करताना किंचित त्रास जाणवत होता; अर्थात काळजी वाटावी इतका तो जास्त नव्हता. संध्याकाळी वेळ मिळाल्यामुळे थोडं फार फिरलो; ज्यामुळे शरीराला त्या वातावरणाची थोडी ओळख झाली. अशी ओळख होणं गरजेचं आहे. आणि तशी द्रासच्या पुढे आल्यापासूनच ओळख होत होती. त्यामुळे शरीर कशी प्रतिक्रिया देईल, ही भिती कमी होत गेली.... लेहमध्ये ठीक होतं, पण पुढे शरीर चांगली प्रतिक्रिया देणार होतं.......

हसनजी व मोहम्मद हुसेनजींच्या रूपाने आम्हांला अत्यंत चांगले लोक मिळाल्यामुळे सर्व व्यवस्था उत्तम होती. कुठे फिरावं, कसं, कधी, काय बघण्यासारखं आहे, इत्यादिबद्दल आम्हांला आमचे ट्रॅव्हल एजंट योग्य मार्गदर्शन करत होते. रात्री दुस-या दिवशीचा कार्यक्रम ठरला. दुस-या दिवशी आम्ही लेह परिसरातील गोम्पा, राजवाडे, सिंधू घाट इत्यादि पाहणार होतो. त्यानंतर मग लदाखमधील लेहपासून दूर असलेल्या भागांमध्ये जाणार होतो. लेह आसपासच्या भेटीसाठी इनर लाईन परमिट लागत नाही; पण अन्यत्र जवळजवळ सगळीकडेच तो लागतो. आम्ही लेहच्या आसपास फिरत असताना हसनजी आमच्यासाठी पेंगाँग त्सो, नुब्रा खोरे आणि त्सो मोरिरीचा परमिट काढून ठेवणार होते.

आलो तेव्हा संध्याकाळी पडत असलेला पाऊस कमी होता; पण रात्रीसुद्धा पडतच होता. अर्थात तो फार काळजी करण्यासारखा नव्हता. हलकासा छिडकावा होता आणि ढग मोठ्या प्रमाणात पसरले होते...... लेह......सकाळी पर्वतांवर दिसणारे कोवळे सूर्यकिरणसकाळी दिसणारं लेहमधील नितळ आकाश...


सकाळी नितळ आकाश म्हणजे वस्तुत: काय असतं हे बघायला मिळालं. खरा निळा रंग. अत्यंत स्वच्छ, शांत, आल्हाददायक निळं आकाश...... सकाळी १० च्या सुमारास निघालो. जवळपासच्या भागातच जायचं असल्यामुळे फार घाई नव्हती.

लेह ही नामग्याल ह्या लदाखच्या पारंपारिक राजघराण्याची राजधानी. त्यामुळे राजवाडा लेहच्या जवळच होता. आम्ही लेहमधून निघून कारूच्या रस्त्याला लागलो. दक्षिण- पूर्वेकडे जाणारा हा रस्ता. हाच रस्ता लेह- मनाली महामार्ग आहे. १९८९ मध्ये लेह- मनाली महामार्ग वाहतुकीला खुला होईपर्यंत लेहला जोडणारा लेह- करगिल- श्रीनगर हाच मुख्य मार्ग होता. कारूपर्यंतचा रस्ता सपाट असल्यामुळे छान आहे. लेहच्या थोडं बाहेर पडलं की लगेचच सिंधू नदी व मग सिंधू घाट लागतो. आम्ही परत येताना तिथे थांबणार होतो.झाडी निसर्गत: आलेली नसून जाणीवपूर्वक लावली असल्याचं लगेच जाणवतं.लेहमधून निघाल्यानंतर शे राजवाडा व ठिकसे गोम्पा बघितले. ह्या प्राचीन वास्तु आहेत. चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यावेळी तिथे विदेशी पर्यटक भरपूर होते. महाराष्ट्रीय पर्यटकांचेही काही गट दिसत होते. काही केसरीसारख्या पर्यटन संस्थेकडून आले होते; तर काही व्यक्तीगतरित्या एकत्र येऊन फिरत होते.बाहेरून दिसणारी ठिकसे गोम्पागोम्पामधील प्राचीन वारसा


इतर काहीही असलं तरी विदेशी पर्यटकांमध्ये उत्साहसुद्धा भरपूर असतो....

बुद्धभूमीतील बुद्धमूर्ती


शे राजवाडा आणि ठिकसे गोम्पा ह्या वास्तु आधी बघितलेल्या लामायुरूतील गोम्पाप्रमाणे काहीशा वाटत होत्या. शे राजवाडा अत्यंत भव्य आहे. ठिकसे गोम्पा तर ब-याच उंचीवर म्हणजे एका टेकडीवर आहे. त्यामुळे टेकडी चढून ठिकसे गोम्पाच्या उंबरठ्यावर पोचतानाच दमछाक झाली. थांबत थांबत जाऊनसुद्धा. त्यामुळे मग आतमध्ये फार फिरून पाहता आलं नाही. आमच्यातला गिरीश मात्र सर्व गोष्टी बारकाईने बघत होता. संपूर्ण प्रवासामध्ये मी व परीक्षित ह्यांच्या तब्येतीचा कस लागला; पण गिरीशला मात्र कुठेही त्रास झाला नाही. जणू कोणत्याही पिचवर दमदार खेळ करणा-या कसलेल्या
फलंदाजाप्रमाणे त्याने लगेचच लदाखच्या पिचसोबत जुळवून घेतलं.

हे आणि लदाखमधल्या इतर सर्व गोष्टी बघताना माझ्यामध्ये फोटो घेण्याचं भान उरतच नव्हतं. नजारा किंवा समोरचं अद्भुत विश्व इतकं विलक्षण होतं, की इतर कशाचच भान राहू शकत नव्हतं. परंतु ह्याही परिस्थितीमध्ये माझ्या मित्रवर्यांनी- गिरीश आणि परीक्षितने फोटो घेण्याचं महान काम पूर्ण केलं व त्यामुळेच हा ब्लॉग ख-या अर्थाने साकार होतो आहे. गिरीश तर जिथे जाणं शक्य असेल; त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करत होता आणि ती वास्तु, तो परिसर डोळ्यात स्टोअर करून घेत होता....

शे आणि ठिकसे पाहून झाल्यानंतर जेवण केलं. ह्या परिसरात मात्र फार चांगलं हॉटेल नव्हतं. ह्या वास्तुंपेक्षा अधिक आकर्षण अर्थातच सिंधू दर्शन घाटाचं होतं. लालकृष्ण अडवाणींच्या पुढाकारातून गेल्या दशकाच्या सुरुवातीला सिंधू घाट बांधण्यात आला. तो लेहपासून सुमारे १० किमी दक्षिणेला आहे आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये तिथे सिंधू दर्शन महोत्सव भरतो. सिंधू नदीवरील घाट असल्याने निश्चितच विशेष वाटत होतं. पण असंसुद्धा वाटलं की घाट बांधण्यासाठी नदीला बांध घातला आहे, मर्यादित केलं आहे. लेहच्या अगदी जवळच्या प्रदेशामध्ये सिंधू नदीच्या बाजूचा भाग समतल आहे. त्यामुळे नदीचं पात्र काहीसं छोटं व संथ आहे. त्यातच घाट बांधल्यामुळे ते अजून छोटं झाल्यासारखं वाटतं. घाटाचं बांधकाम चांगलं होतं. नदीमध्ये पाय बुडवून पहुडता येत होतं. छोटासा प्रवाह आणि त्यामध्ये काही छोटी बेटं दिसत होती. लाटा फार लहान होत्या. सिंधू नदीच्या मानससरोवरापासून कराचीपर्यंतच्या प्रवासातला हा उगमाच्या तसा खूप जवळचा टप्पा; त्यामुळे नदी फार मोठी नव्हती.


संथ वाहते सिंधूमाई....सिंधू नदी...... तो अनुभव...... खालत्सेपासून सतत सिंधू नदीची सोबत मिळत होती. आम्ही बसलो असतानाच आणखी एक मोठा मराठी पर्यटकांचा समूह आला. काश्मीरमध्ये सर्वत्र मराठी पर्यटकांनी ओळख निर्माण केलेली आहे. अगदी आमच्या हसनजींनाही ‘चांगला’ हा शब्द चांगला माहिती होता! गंमत म्हणजे ‘चांगला’ हा शब्द पुढे आम्हांला अगदी ‘चांगला’ लक्षात राहणार होता. पण अजून त्याला वेळ होता......

रौद्र सौंदर्य!
पर्वतांची दिसे दूर रांग....

सिंधू दर्शन स्थळ


भारावलेल्या अवस्थेत बराच वेळ सिंधू घाटावर पहुडलो. ऊन जाणवत होतं, पण ढगसुद्धा होते. दूरवर बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मनमुराद पहुडणं झाल्यावर व तो अनुभव मनामध्ये साठवल्यावर निघालो. वेळेअभावी हेमीस ही एक खूप मोठी गोम्पा बघता येणार नव्हती. हेमीस हे एक अभयारण्यसुद्धा आहे व ते लेह आणि झांस्कर खो-याच्या मधल्या विस्तृत भागात पसरलं आहे. हिमशिखरांकडे बघून ‘तिथे’ काय असेल, ह्याची कल्पना येत होती. पण त्याच्या दर्शनाचा योग अजून आला नव्हता............सिंधू घाटानंतर लेह पॅलेस बघण्यासाठी गेलो. हा लेह शहराच्या पूर्व भागात एका उंच टेकडीवर आहे. इथे राजवाडा आणि संग्रहालय आहे. बराच उंचीवर होता व खालून पर्यटक पायवाटेनेसुद्धा येत होते. उंचावरून दूरवरचे बर्फाच्छादित पर्वत व खाली लेह शहर सुंदर दिसत होते.... समोरच एका डोंगरावर एक पांढरी वास्तु दिसत होती. ती म्हणजे शांती स्तुप हे समजलं. लेह- दर्शनातला ते आमचं शेवटचं स्थान होतं. ह्या सर्वच ठिकाणी पुरातत्त्वशास्त्रज्ञाला व इतिहासाच्या अभ्यासकाला भरपूर खाद्य मिळेल. पण सामान्य दृष्टीकोनातून ह्या सगळ्या वास्तू ब-याच एकसारख्या वाटतात. समोर दिसणा-या शांतीस्तुपाचा मार्ग मात्र बराचसा फिरून आणि लेह शहराच्या मध्यभागातून जात होता.प्राचीनता आणि आधुनिकता- पांढ-या छोट्या वास्तू प्राचीन आहेत.

राजवाड्यावरून दिसणारे लेह शहर


समोर दिसणारा शांतीस्तुप आणि लेह शहराचा काही भाग


शांतीस्तुप...... लेह- दर्शनामध्ये तसे दोनच भाग मनाला भिडले. एक म्हणजे सिंधू दर्शन स्थळ आणि दुसरा शांती स्तुप!! अत्यंत भव्य; एका उंच टेकडीवर केलेलं विशाल बांधकाम. अत्यंत उत्कृष्ट आणि भव्य. उंच टेकडीवर आल्यामुळे एक मोकळेपणा येतो; प्रशस्त वाटतं. सर्व दिशांना लांबवर दिसणारे पहाड आपल्याच उंचीवर आहेत; हा (गोड) भ्रम वाटू शकतो. अत्यंत प्रसन्न वातावरण आणि भरून वाहणारे वारे. हळुहळु ते वारे आणखीनच थंड व गार झाले. उंचावर असल्यामुळे वा-यांसाठी रान मोकळे. त्यामुळे थंडी झोंबण्यास सुरुवात झाली... लदाख!
शांती स्तुपाचा कळस

समोर दिसत असलेले पर्वत.... !शांतीस्तुपामध्ये ध्यान कक्ष आणि इतरही अनेक वास्तु आहेत. इथल्या ध्यान कक्षातील ही बुद्ध मूर्ती. ह्या मूर्तीमध्ये काही वेगळेपणा आढळतो का? बारकाईने पाहिल्यास लक्षात येऊ शकेल.शांती स्तुपातील बुद्धमूर्ती

ही बुद्ध मूर्ती काहीशी जपानी वळणाची आहे. जपानी सरकारने हा शांतीस्तुप इथे बांधला आहे. जपानी लोकांचं काम उठून दिसतं, इतका हा स्तुप वैभवशाली व विशाल आहे.स्तुप पाहिल्यानंतर खूप काही बघितल्याचं व अनुभवल्याचं समाधान मिळालं. संध्याकाळ झाली होती व अत्यंत थंड हवा होती. दूरवर पाऊस दिसत होता. वारे जणू आम्हांला उचलून फेकण्याच्या विचारात होते.

शांतीस्तुप पाहून परत निघालो. शांतीस्तुपापर्यंत अगदी वर वाहनं जातात आणि काही लोक लेह शहरातून चालतसुद्धा येतात....... ते सहजपणे खालून अगदी वरपर्यंत चालत येतात.....

परत जाताना खाली मुख्य वस्तीतील बाजारपेठ लागली. भरपूर दुकानं होती. बरेचसे विदेशी पर्यटकही दिसत होते. दुकानं व हॉटेल बरीच महाग असतील असं वाटलं. पण ती तशी नव्हती. अजूनही लेहमध्ये पारंपारिक साधेपणा व आतिथ्य दिसतं.

संध्याकाळी हॉटेलवर जाऊन थोडा आराम आणि मग जवळच्या इंटरनेट कॅफेला भेट दिली. दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली. हसनजींनी आमच्यासाठी परमिट आणले होते. त्यामुळे काही अडचण नव्हती. आम्ही पेंगाँग त्सो (पेंगाँग सरोवर) बघायला जाणार होतो. पण परीक्षितला किंचित त्रास होत असल्यामुळे त्याने उद्या आराम करावा असा सल्ला हसनजींनी दिला व आमच्या इथून पुढे सोबत असणा-या ड्रायव्हरशी ओळख करून दिली. त्यांचं नाव हैदरभाई होतं. सकाळी ठीक साडेपाच वाजता आम्ही निघणार होतो.

एकच दिवसात हसनजी व त्यांचे साथीदार आणि हॉटेल अगदी ओळखीचं होऊन गेलं. काश्मीर, दहशतवाद ह्याबद्दल वाटणारी चिंता कुठेच राहिली नव्हती. नेहमीच राहतो अशा सहजतेने आम्ही लेहमध्ये राहिलो. अर्थातच मनामध्ये लदाख, हिमालय व आम्ही घेत असलेला अनुभव ह्याबद्दल अनंत उत्तेजना होती......... “तिथे” असण्याचा अनुभव “तिथे” येऊ शकतो.

आम्ही “जिथे” होतो; तिथून पुढे जाताना आता आम्हांला अनेक मोठ्या घाट माथ्यावरून जायचं होतं. जणू लेहच्या आसपास असलेल्या नितांतसुंदर, श्रीमंत व समृद्ध निसर्गाचं संरक्षण करण्यास बसलेले हे ‘चांगले’ रखवालदारच! कुठेही जायचं तर चांग-ला, खार्दुंग-ला अशा रखवालदारांना जुले (लदाखी भाषेत रामराम) करूनच जावं लागणार.... आणि पुढच्या दिवशी आम्हांला चांगलाला भेटायचं होतं आणि चांगलाचा अनुभव चांगलाच येणार होता......

क्रमश:


पुढील भाग: बर्फातून चांगलामार्गे पेंगाँग त्सो......2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. फोटोबायॉग्रफी असते तसेच फोटो ब्लॉग झाला आहे. फोटो कॅप्शनची सूचना पाळलेली असल्यामुळे बरे वाटले

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!