Sunday, May 27, 2012

लोब्संग राम्पा: एक महागाथा.........

स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी स्वत:चं वर्णन “पाश्चात्य जगावर बाँबप्रमाणे कोसळलो,” असं केलं आहे. अगदी त्या धर्तीवर “पाश्चात्य आणि सर्व जगावर कोसळलेला एक महामानव,” असं लोब्संग राम्पा ह्यांचं वर्णन करता येईल. हा एक खराखुरा महापुरुष- श्रेष्ठ लामा आणि तिबेटी वीरपुरुष- गेल्या शतकात होऊन गेला. दुस-या महायुद्धाच्या काळखंडात त्याने असामान्य संघर्ष केला.... त्याचं एक पुस्तक हातात घेतलं. कधी पूर्ण झालं कळलंच नाही. मग दुसरं. मग तिसरं. त्या तीन पुस्तकांचं रसग्रहण आणि लोब्संग राम्पा कोण होता, ह्याचं आकलन करण्याचा हा एक प्रयत्न....



द थर्ड आय

द थर्ड आय म्हणजेच मराठीत भाषांतरित झालेलं ‘तृतीय नेत्र’ हे लोब्संग राम्पा (१९११- १९८१) ह्यांचं पहिलं पुस्तक. पुस्तकाची सुरुवात चार वर्षाच्या लोब्संगपासून होते. चार वर्षांचा लोब्संग घोड्यावर बसायला शिकत असतो आणि त्सूबाबा ह्या शिक्षकाकडून स्वसंरक्षण-कला शिकत असतो. तिबेटी प्रथेप्रमाणे सातव्या वाढदिवशी लोब्संगचं भविष्य वर्तवलं जातं. त्याचं भविष्य उज्ज्वल असतं, तो महान पद प्राप्त करणार असतो; परंतु त्याचं आयुष्य संघर्षमय असतं आणि त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय असतं. त्यानंतर लगेचच तो ल्हासा जवळच्या चाकपोरी आश्रमात दाखल होतो. तिबेटमधील उच्च दर्जाच्या निवडक आश्रमांपैकी हा एक आश्रम. आश्रमात प्रवेश घेण्यापासून त्याची खडतर परीक्षा सुरू होते. तीन दिवस त्याला आश्रमाच्या बाहेर एका स्थितीत अजिबात हालचाल न करता बसावं लागतं. ही आश्रमाची चाचणी असते! आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण होतो. मग हळुहळु आश्रमाच्या पद्धती, गुरूजन, सहविद्यार्थी ह्यांची त्याला ओळख होते. त्याचे गुरू मिंग्यार डोंडूप लामाश्री त्याला घडवण्यास सुरुवात करतात. आधीपासून त्याची आध्यात्मिक उन्नती झालेली असल्यामुळे व ह्या जन्मात एका मोठ्या ध्येयाची पूर्तता हे त्याचं दायित्व असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा खडतर प्रशिक्षण मिळतं. आश्रमातल्या कठोर वातावरणामध्ये तो पारंपारिक विद्यार्जन करतो.

एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची योग्यता एका पातळीवर पोचते. भावी जीवनातील कार्य पूर्ण करण्यासाठी डोंडूप लामाश्री व अन्य गुरूजन मिळून त्याच्या कपाळावर विशेष अशी शस्त्रक्रिया करतात व त्याचा तृतीय नेत्र जागृत करतात. तिबेटी मान्यतेनुसार प्राचीन काळी मानवामध्ये आज असाधारण वाटणा-या अनेक शक्ती होत्या आणि प्रत्येकाजवळ तिसरा डोळाही होता; पण काळाच्या ओघात जसं मानवाचं स्खलन झालं, तशा ह्या शक्ती संपत गेल्या. फक्त काही पुण्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच त्या शक्तींसह जन्म घेऊ शकतात. आश्रमात लोब्संगचे जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाबरोबरच त्याच्या आध्यात्मिक शक्तींना सक्रिय करण्यात येतं आणि म्हणूनच त्याचा तिसरा डोळा सुरू केला जातो. कपाळावरचं ऑपरेशन झाल्यावर काही दिवस त्याला आराम करावा लागतो. शस्त्रक्रियेचं वर्णन, इतर संदर्भ आणि तपशील (उदा., डोळे बंद असल्यामुळे त्याला अंधा-या खोलीत ठेवलं, काही दिवसानंतर एक मंद पणती लावली, रोज तिची वात थोडी थोडी मोठी करत नेली व हळुहळु डोळ्यांना उजेडाची सवय केली) मूळातून वाचण्यासारखे आणि अत्यंत विस्मयजनक आहेत. तिस-या डोळ्यामुळे त्याला माणसांचे विचार व शारीरिक स्थिती उत्तम प्रकारे दिसते. तिबेटी आध्यात्मात सांगितलेला ऑरा- वलय त्याला दिसतात. प्रत्येक माणसाच्या वलयाच्या रंगावरून आणि स्थितीवरून त्याची मन:स्थिती, विचार, शारीरिक स्थिती ह्या गोष्टी त्याला समजू लागतात. ह्या सर्व वर्णात तिबेटी आध्यात्मिक प्रगती, तिबेटी संस्कृती ह्यावर प्रकाश टाकला गेला आहे. आणि अनेक गोष्टी चमत्कारिक व विस्मयजनक असल्या तरी त्या सुसंबद्ध आहेत.

चाकपोरी आश्रमात डोंडूप लामाश्रींच्या हातांखाली लोब्संगचं प्रशिक्षण पुढेही सुरू राहतं. त्याला लामापद प्राप्त होतं. तिबेटी वैद्यकशास्त्र, शल्यक्रिया आदिमध्ये तो पारंगत होतो. आश्रमामध्ये दर वर्षी दुर्मिळ वनौषधींसाठीच्या सहलीचा एक कार्यक्रम असतो. त्यात तो भाग घेतो. दूरवरच्या आणि ल्हासापेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात जाऊन तो वनौषधी आणण्याच्या मोहिमेत सहभागी होतो. तिबेटमधील पतंग उडवण्याच्या पद्धतीचंही वर्णन छान आहे. हे पतंग म्हणजे ग्लायडरसारखे मोठे असतात. त्यातून उंच डोंगरावर काही लोक थोडा वेळ हवाई भ्रमण करू शकतात. तिबेटी गुरूकुल पद्धती, आध्यात्मिक परंपरा, जीवनपद्धती ह्यांचं वर्णन सुंदर आहे.

ल्हासामधील तेरावे दलाई लामा डोंडूप लामाश्रींचे मित्र असतात आणि लोब्संगवरही त्यांचा जीव असतो. लोब्संगच्या तिस-या नेत्राचं काम इथे सुरू होतं. दलाई लामांना भेटायला विविध लोक- राजकीय पाहुणे येत असतात. ह्या पाहुण्यांचे उद्देश नक्की कसे आहेत, त्यांचे अंत:स्थ विचार काय आहेत, हे त्यांना लोब्संगकडून काढून घ्यायचं असतं. दलाई लामा लोब्संगवर प्रसन्न होतात. ल्हासाच्या पोताला आश्रमाचं वर्णन दिलं आहे. एकदा डोंडूप लामाश्री व लोब्संग आश्रमाच्या सर्वसामान्यांना प्रतिबंधित असलेल्या आणि फक्त उच्च लामांना खुल्या असलेल्या जमिनीखालच्या भागात जातात. तिबेटी परंपरेतील वैभवशाली वास्तु, पुरातन ग्रंथ, आध्यात्मिक साधनं इत्यादि तिथे असतात. आणखी गूढ अशाही ब-याच गोष्टी असतात.

त्यानंतर वनौषधी आणण्यासाठी तिबेटच्या एका अतिदुर्गम प्रदेशातील थरारक मोहिमेचं वर्णन दिलं आहे. तिबेटच्या उत्तर- पश्चिम भागामधील चांग- तांग ह्या पर्वतीय प्रदेशात डोंडूप लामाश्रींच्या नेतृत्वाखाली एक मोहिम जायला निघते. कित्येक महिने चालणा-या ह्या मोहिमेसाठी भरपूर सामग्री, घोडे, तट्टं इत्यादी तयारी केली जाते. तिबेटचा हा अतिदुर्गम भाग असतो. ल्हासा व आसपासच्या प्रदेशाची उंची ४००० ते ५००० मीटर आहे; पण चांग तांग ह्या उत्तर पश्चिम तिबेटमधील भागाची उंची ७००० ते ८००० मीटर असते आणि प्रवास पूर्णत: अशक्यप्राय असतो. बर्फाचे डोंगर, द-या, रस्त्यांचा अभाव, प्रतिकूल वातावरण, संपूर्ण निर्मनुष्य अशा सर्व परिस्थितीत मोहीम सुरू राहते. कित्येक साथीदार व घोडे आजारी पडतात. त्यांना वाटेतल्या एका शेवटच्या मुक्काम करण्यायोग्य ठिकाणी ठेवून उरलेले लोक पुढे जातात. खडतर प्रवास सुरूच राहतो. सर्व जण गळून जातात. सर्वांचे हाल होतात. तेव्हा कुठे चांग- तांग पर्वतीय प्रदेशात ते पोचतात. तिथलं हवामान सुखद व आल्हाददायक असतं. वनौषधींचा शोध घेता घेता त्यांना एक अतिप्राचीन नगरी सापडते. परत असाच खडतर प्रवास करत करत कित्येक महिन्यांनी ते मानवी प्रदेशात येतात. प्रवासाचे तपशील वाचण्यासारखे आहेत. वर्णन असामान्य असलं तरी अतिरंजित आणि अतिरेकी नाही. आपण नकाशात पाहिलं तर चांग तांग हा भाग आपल्याला तिबेटच्या वायव्य सीमेजवळ अक्साई चीनच्या दक्षिणेला आणि लदाखच्या पूर्वेला दिसतो........ अद्भुत...... असंच हे वर्णन आहे.

दहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर लोब्संगचं तिबेटमधलं शिक्षण पूर्ण होतं आणि वयाच्या अठराव्या वर्षी तो वरिष्ठ लामा होतो (सुमारे १९२९). जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक शिक्षणाची गरज असते; म्हणून तो तिबेट सोडतो. चीनच्या मध्यभागात असलेल्या चुंगकिंग (आजचे Chongqing) ह्या शहरात जाण्यासाठी तो निघतो. घर, आई- वडील ह्यांची त्याची आधीच ताटातूट झालेली असते. आणि तिबेटमध्ये आगामी येणा-या संकटांच्या संदर्भात भावी आयुष्यातल्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी चुंगकिंगला जायला निघताना लोब्संगची गुरूजी, आदरणीय दलाई लामा व मातृभूमी तिबेट ह्यांचीही ताटातूट होते आणि इथेच ‘द थर्ड आय’ हे पुस्तक समाप्त होतं.......................



डॉक्टर फ्रॉम ल्हासा

मराठीतलं तृतीय नेत्र वाचून झाल्यावर विलक्षण कुतूहल निर्माण झालं. इंटरनेटवर थोडं सर्च केलं आणि लगेच लोब्संग राम्पा ह्याच्या विषयी भरपूर माहिती मिळाली आणि त्याची पुस्तकंही डाऊनलोड करून वाचता आली! त्यामुळे लोब्संग राम्पाच्या जीवनयात्रेची महागाथा पुढे वाचता आली! डॉक्टर फ्रॉम ल्हासा हे त्यांचं दुसरं पुस्तक. ‘द थर्ड आय’ जिथे संपतं, तिथून हे पुस्तक सुरू होतं. निवडक साथीदार आणि तंदुरुस्त घोड्यांसोबत लोब्संगचा प्रवास चुंगकिंगच्या दिशेने सुरू होतो.... प्रवासवर्णन, जीवनशैली, तिबेटची माहिती ह्यांचं अत्यंत सुंदर मिश्रण ह्यात आहे. तिबेट हा अतिउंचीवरील प्रदेश. सरासरी उंची चार हजार मीटर आणि विलक्षण थंड हवामान. त्यामुळे जसे ते अतिउंचीवरून कमी उंचीच्या प्रदेशात येतात, तशा त्यांना अडचणी येतात. शरीराला कमी उंचीच्या वातावरणाची सवयच नसते. त्यामुळे उष्ण हवामान, जास्त घनतेची हवा ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. तोपर्यंत चिनी संस्कृतीही सुरू झालेली असते. सर्व बदलांचा त्रास होतो. तरीही त्यांचा प्रवास सुरू राहतो. रात्री वाटेत लागणा-या एखाद्या मठात मुक्काम करत प्रवास सुरू राहतो. आणि हे मठ दलाई लामांच्याच परंपरेतलेच असे नसतात. परंतु कोणत्याही विचारधारेचा मठ असला, तरी यात्रेकरूंची व्यवस्था केली जाते! उष्ण प्रदेश, दमट हवामान, वादळी वारे ह्यांचा सामना करत करत ते पुढे जातात. एका टप्प्यावर आल्यावर त्यांना पक्का रस्ता लागतो आणि तिथून चार चाकांच्या वाहनांची वाहतुक सुरू होते! नवीन जगच सुरू होतं.

यांगत्सेच्या किनारी असलेलं चुंगकिंग हे तत्कालीन चीनमधलं एक मुख्य ज्ञानकेंद्र व बाजारपेठ असते. लोब्संग शहरी जीवन, काही प्रमाणात पाश्चात्य प्रभाव पहिल्यांदाच बघतो. तिथल्या एका वैद्यकशास्त्र महाविद्यालयात तो प्रवेश घेतो. त्याचे गुरूजी व दलाई लामांच्या ओळखीमुळे त्याची व्यवस्था होते. वैद्यक शास्त्रातलं त्याचं ज्ञान तपासलं जातं. त्याचं कठोर प्रशिक्षण व ज्ञान ह्यामुळे त्याचं ज्ञान अर्थातच भरपूर असतं. फक्त मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन विषय त्याला पूर्णपणे नवीन असतात! आणि इथेच गमती- जमती होतात! इलेक्ट्रिक करंट शिकवतानाच्या प्रात्यक्षिकामध्ये ‘करंट’ काय असतो, ह्याचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थ्यांना छोटा शॉक देऊन करंट म्हणजे काय, हे शिकवलं जातं. परंतु आध्यात्मिक साधनेमुळे लोब्संगला करंटची जाणीवच होत नाही (फक्त किंचित उष्णता जाणवते). काही तरी गडबड झाली, असं बघून शिक्षक जेव्हा स्वत: हात लावतात, तेव्हा त्यांना मात्र मोठा धक्का बसतो!! असंच मॅग्नेटिझमच्या प्रात्यक्षिकामध्ये होतं. लोब्संगला तिस-या डोळ्यामुळे चुंबकीय क्षेत्र दिसत असतं आणि हेच त्याच्या शिक्षकांना कोड्यात टाकतं. ह्या चिनी महाविद्यालयात अमेरिकन पद्धतीने वैद्यकशास्त्र शिकवलं जात असतं. तिबेटी पद्धत व पारंपारिक ज्ञान व अमेरिकन ज्ञान ह्यांच्यासंदर्भात वर्णन छान आहे. पाश्चात्य उथळ ज्ञानापेक्षा पौर्वात्य ज्ञानात जास्त शहाणपणा व खोली आहे, असं लोब्संगचं मत असतं. अनेकदा त्रास देणा-या आडदांड लोकांना लोब्संग मानेतली एक नस दाबून एका क्षणात लोळवतो. त्याचं आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण सुरू राहतं.

योगायोगाने त्याची ओळख एका चिनी पायलटशी होते. हळुहळु उत्सुकतेपोटी तो त्यांच्याकडून विमान उडवण्याचं तंत्र शिकून घेतो आणि एकदा चक्क विमान उडवतो! त्याचं कौशल्य पाहून चैंग- कै- शेकचे लोक त्याला चिनी विमानदळात घेऊ इच्छितात. परंतु ह्यावेळीच अनेक दुर्घटनांना सुरुवात होते. चुंगकिंगमधले लोब्संगचे एक ओळखीचे लामा प्राणत्याग करतात. त्याचवेळी त्याला त्याचे गुरूजी- डोंडूप लामाश्री ह्यांनीही प्राणत्याग केल्याचं कळतं. तो न राहवून शोक करायला लागतो. त्याचा शोक पाहून डोंडूप लामाश्री सूक्ष्म देहाने येऊन त्याचं सांत्वन करतात आणि त्याला पुढच्या खडतर प्रसंगांना सामोरं जाण्यास सांगतात. त्यातून तो सावरला नसतानाच बातमी येते की आदरणीय दलाई लामा लवकरच शरीर सोडणार आहेत. त्याला आणि आणखी एका लामाला ल्हासाला येण्यासाठी मानसिक दूरसंवेदन- टेलिपॅथी पद्धतीने निरोप दिला जातो. एक वरिष्ठ लामा असूनही भावना आवरणं त्याला जड जातं. सत्वर तो ल्हासाला यायला निघतो. ह्यावेळी मात्र त्याच्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत (जिथे रस्ता जाऊ शकतो तिथपर्यंत!) एका मजबूत अमेरिकन गाडीची व्यवस्था केली जाते. ही गाडी दिवसरात्र प्रवास करून त्याला अर्ध्या वाटेवर रस्ता संपतो तिथे असलेल्या एका मठात आणून सोडते. ह्या मठातल्या मठाध्यक्षालासुद्धा टेलिपॅथी संदेश आलेला असल्यामुळे त्याने एक मजबूत घोडा लोब्संगसाठी तयार ठेवलेला असतो!

लोब्संग ल्हासामध्ये गुरूजी व आदरणीय दलाई लामांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून आणि सहाध्यायी, मित्र आदिंचा अखेरचा निरोप घेतो. तिबेटी पद्धतीप्रमाणे दलाई लामांचा मृतदेह विशेष प्रकारे जतन करून पवित्र वास्तूत ठेवला जातो. विशेष म्हणजे त्यांचं मस्तक वारंवार पूर्वेकडे वळतं!! ह्याचं कारण म्हणजे पूर्वेकडून येणा-या (चिनी आक्रमणाच्या) संकटाबद्दल ते अखंड सावधानतेचा इशारा देत असतात. लोब्संग ल्हासाला अखेरचा रामराम करून तो चुंगकिंगच्या दिशेने घोड्यावरून सुसाट निघतो. मुक्कामाच्या मठामध्ये नवीन घोडा घेऊन तो न थांबता प्रवास करतो. परत त्याला तीच मजबूत गाडी मिळते आणि अखेरिस तो चुंगकिंगला येऊन पोचतो.

त्या वेळी चुंगकिंगमध्ये हळुहळु जपानी आक्रमणाच्या बातम्या येत असतात. अनेक भागांमध्ये जपानी कारवाया सुरू झालेल्या असतात. त्याला चैंग-कै शेकच्या अधिका-यांचा निरोप मिळतो. तो चिनी विमानदलात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून दाखल होतो! आक्रमणाच्या तणावामुळे शांघायजवळ परिस्थिती बिघडत असते व तिथल्या वैद्यकीय सेवेसाठी तो शांघायला येतो. काही काळाने म्हणजे ७ जुलै १९३७ रोजी मार्को पोलो पूल ओलांडून जपानी सेना शांघायवर हल्ला करते. ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’मधला इथून पुढचा भाग म्हणजे खरीखुरी युद्धकथाच आहे. विपरित परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही साधनांशिवाय रुग्णसेवा करत असताना जपानी लोक लोब्संगला पकडतात. त्याचे असंख्य हाल करतात. त्याने प्रश्नांची उत्तरं द्यावीत म्हणून अत्यंत क्रूर हाल करतात. उलटे टांगून हात गळ्याशी बांधणे, नखं कापून त्यात मीठ चोळणे, उपाशी ठेवणे, आगीवर टांगून ठेवणे आणि असंख्य. कित्येक दिवस, आठवडे व महिने ते त्याचा छळ करतात, पण तो “मी चिनी सेनेत अधिकारी आहे व युद्धकैदी आहे,” ह्याव्यतिरिक्त काहीच सांगत नाही. प्रचंड अत्याचार सहन केल्यानंतर तो कसाबसा तुरुंगवासातून मृतदेहाचं सोंग घेऊन निसटतो आणि एका वृद्ध चिनी माणसाच्या मदतीने परत चैंग- कै- शेकच्या चिनी सैन्याला मिळतो. काही दिवस चुंगकिंगमध्ये राहतो. त्यावेळी चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चुंगकिंगचीही रया गेलेली असते. तिथेही हल्ले सुरू झालेले असतात. थोडा आराम करून व जुन्या लोकांना भेटून तो परत युद्धभूमीवर येतो. रुग्णसेवा करत असतानाच परत पकडला जातो. पुन: भयानक छळ आणि हाल. परत एकदा तो निसटतो आणि एका युरोपीयन व्यक्तीच्या घरी जातो. पण तो जपानी लोकांना सामील झालेला असल्यामुळे लोब्संग परत एकदा जपानी लोकांच्या तावडीत सापडतो. सर्वत्र जपानच्या विजयाच्या बातम्या येत असतात.

लोब्संग माहिती देत नसल्यामुळे ते त्याचा अविरत छळ करतात. पण कठोर परिश्रम आणि आध्यात्मिक प्रगतीच्या बळावर लोब्संग टिकाव धरतो. छळामुळे होणा-या वेदनांचा सामना करण्यासाठी त्याला वेदनांवरून मनाचं ध्यान दूर न्यायचं असतं. त्यासाठी तो जुन्या आठवणी, गुरूंचे उपदेश व गतकालीन प्रसंग आठवतो. चांग- तांग पर्वतीय प्रदेशातील त्यांचा प्रवास, प्राचीन नगरी, तिथली उपकरणे, तिथे दिसलेले यती इत्यादी त्याला आठवतात. मधून मधून गुरू सूक्ष्म रूपाने येऊन त्याला प्रेरणा देतात. शेवटी त्याला एका महिला कैद्यांच्या कँपचा डॉक्टर म्हणून काम देतात. त्या भागात मिळणा-या वनस्पतींचा वापर कुशलतेने करून तो ट्रॉपिकल अल्सरसारख्या भितीदायक रोगावर औषधोपचार तयार करतो. कैद्यांना गोळा करून साधनं तयार करतो. श्वासाचा परिणामकारक वापर करून वेदना कशा कमी जाणवतील, ह्यासाठी कैद्यांना प्रशिक्षण देतो. परंतु काही दिवसांतच त्याला पुन: बंदी करून जपानमधल्या तुरुंगात आणलं जातं. शांघायहून जवळजवळ एक मृतदेह म्हणून जपानच्या मुख्यभूमीपर्यंतच्या प्रवासाचं केलेलं वर्णन थरारक आणि भीषण आहे. युद्ध आणि साम्राज्यवाद असेल, तर नाव कोणतंही असो, वास्तव सैतानाचा साक्षात्कार, हेच असतं हे दिसतं.....

जपानच्या मुख्यभुमीतील हिरोशिमाजवळच्या एका बंदिवासात लोब्संगला ठेवण्यात येतं. सततच्या छळामुळे व शरिरावर झालेल्या असंख्य आघातांमुळे तो अत्यंत अशक्त असतो आणि कित्येक दिवस पडून असतं. त्याचं स्थळ- काळाचं भान शिल्लक राहात नाही. फक्त ह्या तुरुंगात समुद्रातून कोणत्या मार्गाने आलो, तितकं त्याला लक्षात असतं. लोब्संग कमालीचा अशक्त असतो. अशक्त लोब्संगच्या सूक्ष्म देहाला उच्च लोकामध्ये बोलावलं जातं. तिथे लोब्संगला त्याचे गुरुजी व अन्य लामा भेटतात. ते त्याला सांगतात, “तू अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून जात आहेस. तुझ्या कष्टांना व हाल- अपेष्टांना मर्यादा नाहीत. तुझं शरीर खिळखिळं झालं आहे. आम्ही तुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही असा एक ब्रिटिश नागरिक बघितला आहे, जो प्राणत्याग करू इच्छितो. त्याचं शरीर तुला मिळू शकतं. पण अजून त्यासाठी सात वर्षं बाकी आहेत. तुला हर हवं असेल, तर तू शरीर सोडून आमच्यात येऊ शकतो; तुला कोणीही नाव ठेवणार नाही.” त्यावर लोब्संग त्याच्या विशेष ध्येयासाठी झुंजत राहण्याची इच्छा व त्याचा निर्धार बोलून दाखवतो. सूक्ष्म देह परत त्याच्या शरिरात येतो आणि त्याचा तुरुंगवास सुरू राहतो.

एके दिवशी लोब्संगला विमानाची घरघर ऐकू येते. त्याला माहिती असलेल्या विमानांपेक्षा ती वेगळी असते. तेवढ्यात बाहेर सर्वत्र हल्लकल्लोळ उठतो आणि सैनिक आरडाओरड सुरू करतात. सर्वत्र एकच थैमान सुरू होतं. “सम्राट, आम्हांला ह्या प्रलयापासून वाचवा,” असं सैनिक म्हणत असतात. लोब्संगने लिहिलं आहे, की तो हिरोशिमावरचा ६ ऑगस्ट १९४५ चा अणुबाँब होता आणि अर्थातच हे त्याला त्या वेळी समजलं नाही.. लोब्संगला जाणवतं की सर्व सैनिक प्रचंड भितीने पळत आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. तो इतका अशक्त असतो, की त्याच्या खोलीला कुलुपही नसतं. तो हळुच बाहेर पडतो. एका सैनिकाचे बूट व पोशाख घेऊन खुरडत खुरडत समुद्राच्या दिशेने पुढे जायला निघतो. कसा बसा तो किना-यावर पोचतो. सर्वत्र अराजकता असते, त्यामुळे त्याला कोणी अडवत नाही. वाळूत त्याला एक नाव दिसते. शक्ती एकवटून तो नावेपर्यंत जातो. त्यात त्याला काही मासे अन्न म्हणून ठेवलेले दिसतात. तो थोडेसे खातो आणि खूप जोर लावून नावेचा दोर तोडतो. नाव मोकळी होते आणि हळुहळु समुद्रात जाते......... असंख्य मरणयातना आणि अत्याचार सहन केल्यावर कित्येक वर्षांच्या तुरुंगवासातून तो मुक्त होतो........ आणि तिथेच ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’ भाग संपतो.



द राम्पा स्टोरी

आत्मचरित्राच्या ह्या तिस-या भागाच्या सुरुवातीला वर्तमानकाळातील काही संवाद आहेत. पण ते समोरासमोरचे किंवा दूरध्वनीवरचे नाहीत; तर सूक्ष्म रूपातील आहेत!! पहिले दोन भाग प्रकाशित झाल्यावर लोब्संगवर काही लोकांनी खूप टीका केलेली असते. खोटं आणि काल्पनिक लेखन असं त्याच्या लेखनाबद्दल बोललं जात असतं. त्याला त्याचे गुरूजी व अन्य लामा समजावून सांगतात, की त्याने लिहिणं खूप आवश्यक आहे. जे लोक आध्यात्मिक प्रवासात थोड्या तरी विकसित अवस्थेत आहेत, ते त्याचं सांगणं समजू शकतील. आणि इतरांनी जरी त्याच्या सांगण्याला खोटं म्हंटलं, तरी त्यांच्या अंतर्मनात त्याची नोंद होईल व योग्यवेळी त्यांनाही त्याची जाणीव होईल. म्हणून ते त्याला लिहिण्यास प्रेरित करतात. आधीच्या भागांकडे एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आत्मचरित्र परत हिरोशिमामध्ये व तिथून बाहेर पडणा-या नावेच्या प्रवासाकडे येतं.....

कितीतरी दिवस, आठवडे, महिने लोब्संगची नाव समुद्रात जात राहते. त्याला स्थळ- काळाचं भान उरत नाही. नावेतले मासे आणि पावसाचं पाणी ह्यावर मधून मधून जागा होणारा लोब्संग पुढे पुढे जात राहतो....... कित्येक काळ उलटल्यावर त्याच्या कानावर काही शब्द ऐकू येतात. त्याची नाव किना-याला लागलेली असते आणि दोन तरुण किना-यावरून त्याच्याकडे येतात. ते त्याला ढकलून नाव स्वत:च्या ताब्यात घेतात. लोब्संग किना-यावर वाळूत बेशुद्ध पडलेला असतो.

शुद्धीवर आल्यावर लोब्संगला त्याला एका जागी आडवं केल्याचं दिसतं. त्याच्याजवळ पाणी व थोडं अन्न ठेवलेलं असतं. तो एका मठात असतो. त्याचे उघडलेले डोळे पाहून एक वृद्ध बौद्ध भिक्षु त्याच्याकडे येतात. दोघांची भाषा चिनी असली तरी त्यात बराच फरक असतो; पण हळुहळु संवाद सुरू होतो. ते भिक्षु त्याला सांगतात की ते वाळूत त्याला बघून शिष्यांना सांगून मठात आणतात. ते हेही सांगतात, की त्यांच्या मठात एक दिवस कोणी विशेष अतिथी येणार आहे, अशी त्यांना पूर्वीपासून सूचना देण्यात आली होती व केवळ त्या कारणासाठी ते वयोवृद्ध भिक्षु शेवटचा श्वास घेत जगत असतात. काही दिवस लोब्संग तिथे विश्रांती घेतो. परंतु नंतर ते भिक्षु त्याला समजावतात की त्याने फार काळ थांबून चालणार नाही, कारण धोका अजून संपलेला नाही आणि भिक्षुही राहणार नाहीत. तो मठ उत्तर कोरियामध्ये असतो (अर्थातच लोब्संगची नाव जपानच्या दक्षिण- पश्चिमेकडून समुद्र ओलांडून उत्तर कोरियाला लागलेली असते!!!). भिक्षुंचे शिष्य त्याला उनगीचा रस्ता सांगतात. उनगी उत्तर कोरियामध्ये रशियन सीमेपासून जवळ असतं (गावाचं आजचं नाव सोन्बोंग आहे आणि ते उत्तर कोरियामध्ये चीन व रशिया ह्यांच्या सीमेलगत आहे). मुख्य रस्त्यावरून न जाता बाजूने चालत चालत तो तिथपर्यंत जातो. चिनी आणि जपानी भाषेत लोकांना विचारत विचारत आणि थांबत थांबत जातो. उनगीमध्ये पोचल्यावर त्याला व्हॅलिडिओस्टॉककडे जायचं असतं. त्याला रशियन लाल फ्रंटियर पेट्रोलचे तीन सैनिक दिसतात. त्यांच्याजवळ पोलिसी कुत्रे असतात. त्याला बघून ते कुत्रे त्याच्यावर धावून येतात.... लोब्संग मनामध्ये त्या कुत्र्यांप्रति सद्भाव व्यक्त करून तो त्यांचा मित्र आहे, असा विचार व्यक्त करतो. कुत्रे त्याच्या अंगापर्यंत येऊन शांत होतात. सैनिकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. ज्या अर्थी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही, त्या अर्थी तो स्थानिक धर्मगुरू असावा, असं त्यांना वाटतं. ते प्रभावित होऊन त्याची मदत करतात. त्याला त्यांच्या गाडीतून व्हॅलिडिओस्टॉकलाही न्यायला तयार होतात.

व्हॅलिडिओस्टॉकमधल्या छावणीमध्ये पोलिसी कुत्र्यांनी वेगळीच समस्या निर्माण केलेली असते. कारण कम्युनिस्ट लाल सोव्हिएत राजवटीमध्ये सैनिक त्या कुत्र्यांना सतत बंडखोरांवर सोडत असतात व त्यामुळे मानवी रक्ताची चटक लागून ते कुत्रे नियंत्रणाबाहेर जात असतात. कुत्र्यांच्या एका दंगलीमध्ये 4 सैनिकसुद्धा ठार झालेले असतात. म्हणून हे सैनिक (त्यातला एक सार्जंट असतो) लोब्संगला कुत्र्यांना नियंत्रणात आणायला सांगतात. तो आणून दाखवतो. मग आणखी कुत्र्यांना नियंत्रणात आणण्याचा ‘पराक्रम’ लोब्संग करतो. त्याच्यामुळे तिथला वरिष्ठ अधिकारी इतका प्रभावित होतो, की त्याला लाल सोव्हिएत सेनेत तो त्याला मानाचं कॉर्पोरेल पद देतो! काही दिवस कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी ते लोब्संगला थांबवून घेतात, पैसे आणि इतर साधनं देतात. लोब्संग त्यांच्याकडून व्हॅलिडिओस्टॉकमधून मॉस्कोला जाणा-या ट्रान्स सैबेरियन रेल्वेच्या प्रवासाची माहिती काढून घेतो. सुरक्षा रक्षकांना चुकवत तो प्रवास कसा करता येईल, हे त्याच्या लक्षात येतं.......

तिथून पुढे त्याचा अखंड प्रवास सुरू होतो...... प्रवास, छळ आणि परत प्रवास. व्हॅलिडिओस्टॉकच्या पुढच्या एका गावात तो मॉस्कोला जाणा-या मालगाडीमध्ये बसतो. पुढे काही दिवसांनी बैकल सरोवराजवळ ती गाडी थांबते. तपासणीच्या वेळी तो ट्रेनमध्ये उतरून मग परत डब्यात चढतो. पण ह्यावेळी डब्यात अजून चार जण असतात. ते त्याच्यावर हल्ला करतात. पण तिबेटी युद्धकौशल्याने लोब्संग त्यांना लगेचच शांत करतो. मग ते त्याला सहकार्य करतात. मालगाडीमध्ये खायला धान्य व पदार्थ मिळतात. सैबेरियातल्या बर्फापासून पाणी मिळतं. निघाल्यापासून जवळजवळ चोवीस दिवसांनी लोब्संग मॉस्कोजवळ पोचतो. तिथून परत प्रवास, कैद, छळ, सुटका, प्रवास असं किती तरी महिने किंवा वर्षं सुरू राहतं. अखेरीस तो युक्रेन- पोलंडमार्गे चेकोस्लोव्हाकियामध्ये पोचतो (दुस-या महायुद्धातल्या जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण युद्धक्षेत्रातून जाऊन!). तिथून मग त्याचा छळ थोडा थोडा कमी होतो. परंतु पाश्चात्य जगातील पद्धती माहित नसल्यामुळे लोक त्याला फसवत राहतात. तरीही स्वत:च्या हुशारीवर असंख्य उद्योग करत तो चेकोस्लोव्हाकिया, इटली, जर्मनी, फ्रांसमार्गे अमेरिकेत पोचतो. ह्या सर्व प्रवासात ड्रायव्हर, इंजिनिअर, मर्चंट नेव्ही इंजिनिअर, रेडिओ निवेदक अशी कित्येक कामं तो करतो.

मधल्या कालावधीत तिबेटमध्ये चीनच्या लाल सेनेने आक्रमण करून तो देश गिळंकृत केलेला असतो (१९५०). सर्वत्र पारतंत्र्य आणि जुलुमशाही आलेली असते. ल्हासामधले मठ जाऊन तिथे नवीन कामगारगृहे येतात. सूक्ष्म रूपात लोब्संग हे पाहतो. सूक्ष्म रूपात त्याचं त्याच्या गुरुजींशी संभाषण होतं. ते त्याला सांगतात, की त्याच्या शरीराचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्याने आता तिबेटमध्ये जाऊन आत्मार्पण करावं, म्हणजे त्याचं शरीर पारंपारिक पद्धतीने जतन करता येईल आणि एका ब्रिटिश नागरिकाच्या शरीरात जाऊन तो त्याचं जीवितकार्य करू शकेल. त्या लामांनी त्या ब्रिटिश नागरिकाशीही संभाषण केलेलं असतं. त्यानुसार तो भारतात मुंबईला येतो आणि तिबेटच्या सीमेवर पोचतो. ल्हासामध्ये शत्रूसैन्य असल्यामुळे तो तिथे जाऊ शकत नाही; परंतु एका दुर्गम पहाडावरच्या मठामध्ये शरीरत्याग करतो. सूक्ष्म रूपात अन्य लामा त्याला सहकार्य करतात व बराच प्रयत्न केल्यावर तो ब्रिटिश नागरिकाच्या शरीरामध्ये शिरतो. तिथून मग त्याचं सुरुवातीला इंग्लंड, नंतर आयर्लंड आणि शेवटी कॅनडामध्ये नवीन आयुष्य सुरू होतं. अनेक छोटीमोठी कामं केल्यावर तो शेवटी लेखक बनतो. आणि ‘द थर्ड आय’ लिहून त्याची लेखन कारकीर्द सुरू होते!! परंतु त्याचं जीवितकार्य मानवतेच्या मुक्तीसाठी शरीराभोवतीच्या वलयांवर (ऑरा) संशोधन करून रोगनिदान करण्यामध्ये सहाय्य करेल, असे उपकरण विकसित करणे, हे असतं. त्याशिवाय पारंपारिक तिबेटी बौद्ध ज्ञानाची तो जगाला ओळख करून देतो. स्वत:च्या अनुभवाद्वारे आणि मिळालेल्या ज्ञानाद्वारे मानवजातीच्या इतिहासाची नव्याने ओळख करून देतो आणि एक प्रकारे पारंपारिक ज्ञानाला नष्ट होण्यापासून वाचवतो.........

समारोप

अशी ही तीन पुस्तकांची रोमहर्षक मालिका आणि असा हा दिव्य लोब्संग राम्पा! त्याने ह्या तीन आत्मचरित्रात्मक पुस्तकांनंतर वैचारिक अशी बरीच पुस्तकं लिहिली. जागतिक तत्त्वज्ञानात त्याने उत्पन्न केलेली लाट अजूनही शांत झालेली नाही....

लोब्संग राम्पाच्या लेखनाला आणि विचारांना नेहमीच कठोर टीका सहन करावी लागली. फेक, खोटारडा म्हणून खूप लोकांनी त्याला बघितलं. पण त्याच्या सांगण्यात अर्थ आहे, असे मानणारेही कमी नाहीत. पाश्चात्य विज्ञान व मानसिकतेबद्दल त्याची मतं कठोर आणि रोखठोक आहेत. पाश्चात्य मानसिकता कमालीची स्वार्थी, स्व- केंद्रित आणि दुस-यांचे शोषण करणारी आहे, असं तो सांगतो. पाश्चात्य मानसिकतेला प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत आणून त्याचे तुकडे तुकडे करून सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करेपर्यंत काहीही पटणार नाही, हे तो सांगतो. निव्वळ आसुरी इच्छा करण्याऐवजी पाश्चात्य मानसिकतेने जर थोडा विनम्रभाव आणि खुली मानसिकता ठेवली, तर त्यांचं भलं होईल, असं सांगायला तो कमी करत नाही.

ह्या तीनही पुस्तकांमध्ये निव्वळ आत्मकथन नाही. त्यामध्ये भरपूर विचारमंथन आहे, सोप्या उदाहरणांसह अनेक आध्यात्मिक साधना आणि प्रक्रियांचं वर्णन आहे. स्वदेशप्रेम आहे, पण अहंकार नाही. अत्यंत खळबळजनक काळात त्याने केलेल्या जगप्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य महत्त्वाचे अनुभव व प्रसंग आहेत. वेगवेगळे देश, संस्कृती, राजवटी, माणसं ह्यांचं भावपूर्ण वर्णन आहे. शिवाय पुस्तकांची शैली निव्वळ तात्त्विक किंवा गंभीर नसून हलकी फुलकीसुद्धा आहे (पासपोर्ट घेऊन देश ओलांडताना/ देशात प्रवेश करताना मला लाल फितीमुळे जितक्या अडचणी आल्या, तितक्या अवैध प्रकारे देशांतर करताना कधीच आल्या नाहीत). जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोब्संगने केलेला पराक्रम अविरत प्रकारे जाणवत राहतो. माणूस देवपदाला जरी पोचला असला, तरीही त्याला हाल अपेष्टांपासून मुक्ती नाही, जे सत्य जाणवतं आणि आपल्या चाकोरीबद्ध जीवनशैलीतल्या छोट्याश्या समस्यांच्या विरोधात थकणारे आपण दिसतो.....

आणखी महत्त्वाचं म्हणजे ह्या तीन पुस्तकांतून दिसणा-या तिबेटी बौद्ध पद्धतीचं व भारतीय योगपद्धतीतील साम्य. गुरू, कुंडलिनी, प्राण, आकाश, कर्म असे शब्द सहजपणे येतात. एकंदर तिबेटी तत्त्वज्ञानाची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात ओळखीचं बरंच काही दिसतं. पद्मासनाने व कायास्थैर्यमने सुरुवात होते. ॐ आहे. ध्यान व योग तर आहेच. शिवाय कर्मसिद्धांत, जीवनविषयक दृष्टीकोनसुद्धा तोच आहे. त्यामुळे भारत किंवा अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, चीन, ब्रह्मदेश, सयाम, थायलंड, कोरिया, श्रीलंका ही बौद्ध संस्कृती असलेली राष्ट्रे ह्यात फरक दिसतच नाही. शेवटी व्यापक सहिष्णू संस्कृती एकच आहे, समानच आहे, हे जाणवतं. फक्त इतकेच देश नाही, तर मानवजात एकच आहे, हे दिसतं. ह्यातल्या ब-याच गोष्टी चमत्कारिक, असंभाव्य वाटतील. पण तरीही ह्या पुस्तकांमध्ये आपण प्रत्यक्ष करू शकतो, अशा गोष्टींही मोठ्या प्रमाणात आहे. उदा., श्वासाचा वापर, विचारांवर नियंत्रण, शरीर सामर्थ्य ह्या संदर्भातील. त्यामुळे जरी आपल्याला काही मतं मान्य नसतील, तरीही मन मोकळं ठेवून ह्या पुस्तकांचा आस्वाद नक्की घेतला, नव्हे अभ्यास केला, तरी त्यातून भलंच होणार आहे.

संदर्भ 

लोब्संग राम्पा ह्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांची पुस्तकं इथून डाऊनलोड करता येतील.

Saturday, May 19, 2012

काळ्या मातीत मातीत....


रणरणता मे महिना. भाजून काढणारं ऊन. अस्मानी आणि सुलतानी दुष्काळ. मागास मराठवाड्यातील एक कोपरा. त्यामधील शेतीची एक झलक.



वखरणीनंतरची रखरखीत जमीन


जमिनीलाच गेला तडा आणि त्यात कापूस उघडा


इतका तरी हिरवा किती प्रदेश असेल?


पशुधन दिसत आहे, चक्क!!!

शेती करता करता आयुष्याची इथे झाली माती
सत्त्व गेले, कस गेला, पीक गेले, गाय बैल गेले, फक्त उरली भिती
पीक आले कर्जाचे, कृत्रिम खताचे आणि बियाणाचे जगण्याची संपली शाश्वती

जगाचा पोषणकर्ता आज रानोमाळ फिरतो
देणा-या हातांची झोळी करून दोन घास मिळवतो
शेत, संसार, जगण्याचा पसारा मोडूनही राब राब राबतो

उत्पन्न गेले, बियाणे संपले, जमीन गेली आणि पाणीही गेले.
परंतु नाही गेली हिंमत, नाही संपली जिद्द आणि नाही सोडला बाणा
सर्व खचले तरी अजून शेतात करतोय पेरणी

उगवेल तो दिवस आणि हवे ते पीक
जेव्हा हटेल दिव्यावरची काजळी
जेव्हा मानवाची जागा निसर्गाच्या मूळाशी असेल

सृजनशीलतीने आणि नावीन्याने देऊ शेतीला उद्योगाचा आधार
झटकू आळस आणि करू अस्सल आणि सकस शेतीचा स्वीकार
अंध:काराच्या ह्या काळरात्री मिळून सारे करू एकच निर्धार


दुधना नदी. लोअर दुधना धरणाचं पाणी असल्यामुळे हा भाग थोडा तरी हिरवा आणि पाणी नेण्यासाठी योग्य दिसतो.....

आजच्या शेतीबद्दल असं जाणवतं की शेती खूप बदललेली आहे. पारंपारिक शहाणपण आणि शाश्वत तंत्रज्ञानाची व कार्यपद्धतीची जागा आज उथळ कृत्रिम खतं, कंपन्यांचं बियाणं आणि सरकारी हस्तक्षेपाने घेतली आहे. सरकारी योजनांच्या आणि विविध माध्यमातून मिळणा-या कर्ज पुरवठ्यामुळे कदाचित शेतक-यांची देण्याची सवय जाऊन जास्त घेण्याची सवय लागली असावी. आज जुन्या अस्सल शेतीची, शुद्ध शेतीची जागा ब-याच प्रमाणात शाश्वत नसलेल्या घटकांनी घेतलेली आहे. त्यामुळे जुन्या शेतीत ज्या ब-याच गोष्टी निसर्गत: मिळायच्या (खत, बियाणं, नैसर्गिक किटकनाशकं जमिनीचा कस, काही प्रमाणात गोधन) त्या सर्व आता जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिमरित्या कराव्या लागतात व त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत. जवळजवळ प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागत आहे. शिवाय अपर्याप्त शिक्षण, बाहेरच्या जगाचा प्रभाव ह्यामुळे शेतक-यांच्या नवीन पिढीत मेहनतीचं करण्याच्या ऐवजी सहजपणे मिळणारं घ्यायची प्रवृत्ती काही ठिकाणी दिसते. त्यामुळे शेतीतील कस आणि जोम घसरला. बदलत्या काळात जुन्या पद्धतीतील चांगल्या घटकांना जोडधंद्याची व उद्योगाची जोडही देणं आवश्यक आहे. त्यामुळे शेतीकडे आणि शेतक-यांकडे समस्यांचा डोंगर म्हणून न बघता सकारात्मक, स्वयंपूर्ण आणि क्रियाशील दृष्टीने बघितलं पाहिजे.

एका असाधारण जपानी शेतक-याचं ‘नैसर्गिक शेती’बद्दल पुस्तक वाचण्यात आलं. त्यातलं तत्त्व- निसर्गच सर्व काम करत असतो. आपलं काम त्याच्या प्रक्रियेत खारीचा वाटा उचलणं. योग्य वेळी बी टाकणं, त्याची काळजी घेणं इतकंच. ते फार शुद्ध प्रकारे शेती करतात. ‘अनावश्यक कष्ट न करता नैसर्गिक शेती’ असं त्यांचं तत्त्व आहे. अर्थात नैसर्गिक अस्सलपणा असलेल्या व प्रदूषण, कृत्रिम बियाणांचा खतांचा- किटकनाशकांचा वापर नसलेल्या ठिकाणी ते शक्य आहे. कमीत कमी साधनांसह आणि कृत्रिम पद्धतीचा अवलंब न करता तितकीच उत्पादक व शाश्वत शेती करण्याच्या पद्धतीची माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.


मूळ जपानी पुस्तकाचा 'द वन स्ट्रॉ रिव्होल्युशन' ह्या इंग्लिश अनुवादाचा हा मराठी अनुवाद

थोडक्यात दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजे. निव्वळ समस्या आहेत असं नाही. समस्या आहेतच, पण त्यातही अनेक छुप्या स्ट्रेंथस आहेत. त्यांचे उपायही आहेत आणि म्हणून आपण संतुलित दृष्टीकोन ठेवला पाहिजे. शेती म्हणजे समस्या आणि समस्याच असा विचार न करता त्याकडे बघितलं पाहिजे. आणि ह्यावर सर्वात चांगला डोळ्यांपुढे येणारा उपाय म्हणजे जिथे जिथे शक्य असेल, तिथे शक्य त्या प्रमाणात शून्यातून एककडे गेलं पाहिजे. नवीन काही निर्माण केलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण इथे बघता येईल.







ह्या काडातून का नाही क्रांती करता येणार?