दि. १७ सप्टेंबर २०२५
✪ सिंहगड, विजयदुर्ग, देवगिरी आणि भटकंतीची लेक- माला!
✪ पेरू, पारा, पारडं, मुग डाळ, अदरक अशा शब्दांचे नवीन अर्थ!
✪ अर्जुन पर्वाची सुरूवात! तुझं अर्जुनला कडेवर घेणं!
✪ ॲलेक्सची तुझ्यावरची माया, त्याचे shows आणि woes
✪ वाळूत, डोंगरात, समुद्रात आणि धबधब्यात केलेली मस्ती
✪ "हा जिल्हाच खारूताईंचा आहे!"
✪ माशाचं पिलू मोठी सायकल चालवायला शिकलं!
✪ वाचन अजूनही कंटाळे पण मस्ती खूप करे
✪ तुझं सलग १५ वाक्य संपूर्ण मराठी बोलणं!
✪ डोंगरांची मजा, कराटे आणि (मला मिळणारे) धपाटे!
✪ मुंज्या, स्त्री आणि भेडिया!
✪ क्रिकेट, बुद्धीबळ आणि तुझं पहिलं मेडल!
प्रिय अदू...
तर अदू! पाबई! आज तुझा अकरावा वाढदिवस!!! ह्या वर्षी गंमतच झाली! पत्र लिहीण्याच्या आधीच तू पत्र मागितलं! जसं ते छोटं बाळ होतं ना जे मागे लागायचं की, गोष्ट सांग गोष्ट सांग. आणि मग ते स्वत:च म्हणायचं, "एकदा काय झालं!" तशी गंमत. गेल्या वर्षभरात अशा खूप गमती झाल्या! आणि अगदी कालची गंमत म्हणजे तू चक्क २४ तास माझ्याशी "मौन" केलंस! मला ते आवडलं! रूसून बसलीस. मी कितीही प्रयत्न केले तरी तू बोलत नव्हतीस. एक बार तय किया तो तय किया! आपण जे ठरवलं ते करायचं ही जिद्द आहे तुझी. वर्षभरात खूप वेळेस तुझी ही जिद्द दिसली! तुझ्या आवडी, तुझ्या गोष्टीमध्ये तू "बीलीव्हर" आहेस. आपण नवीन ठिकाणी राहायला आलो त्या सोसायटीत स्विमिंग पूल तुला मिळाला. किंचितही न घाबरता अगदी "बीलीव्हर" होऊन सहजपणे तू पोहायला लागलीस! चार दिवसांमध्ये मस्त जमायला लागलं! आणि नवीन सोसायटीत तर खूप मित्र- मैत्रिणी मिळाले!